MARATHI POET | WRITER | ORATOR

श्री-गजानन-महाराज-मंदिर-शेगाव-आणि-शेगावचे-चार-धाम

श्री गजानन महाराज संस्थान आणि श्रींचे चार धाम

एक संत आपल्या लहान-लहान कृतीतून जनसमुदायाला कसे घडवत जातात ते आपल्याला शेगावच्या गजानन महाराजांनी शिकवलं. पातूरकरांच्या ऋतुशांती कार्यक्रमा दरम्यान उष्ट्या पत्रावळीतले शितं खाऊन आपल्याला “अन्न हे पूर्णब्रह्म” हा संदेश दिला. बंकटलाल अग्रवाल शेगावचे प्रतिष्ठित सावकार, ज्यांना महाराज सर्वप्रथम दिसले आणि महाराजांमध्ये त्यांना वेगळंच तेज दिसलं. जे तेज बाकी लोकं ओळखू शकले नाही ते बंकटलाल यांनी अचूक ओळखले. आजही शेगावमध्ये महाराजांचा वास आहे आणि तो कायम असणारच. तो असणार कारण तिथले विश्वस्त ज्या प्रकारे व्यवस्थापन सांभाळत आहे, ते कोणत्याही “मॅनेजमेंट स्कूल” शिकवणार नाही. गर्दीचं चोख नियोजन. गर्दी कितीही असो, त्यांचं नियोजन योग्यच असतं. आजतागायत आपण कधीही ऐकलं नाही की शेगावला चेंगराचेंगरी झाली, कारण चोख नियोजन. श्री महाराजांनी आपल्यासमोर नियोजन कसं राहिल, हे सांगितलं आणि ते आपल्यासमोरचं अमलात आणलं. सुरवातीला पाणपोई, प्रसादालय सोबतच स्वच्छता ही समाधी घेण्याअगोदरच महाराजांनी नेमून दिलेली कामं होती. ही कामे आजतागायत चालू आहे. एवढीच नाही तर कित्येक अशी कामे आहे जे आपल्याला जगात कुठेही बघायला मिळत नाही. हेच बघा ना, गर्दी होते आहे तर भक्तनिवासाची संख्या वाढवली आणि दर म्हणाल तर अगदी सामान्य माणसाला परवडेल असेच आहे. मंदिर परिसरात एकूण ६ भक्तीनिवास आहे; एवढे कमी पडायला नको म्हणून आनंद विसावा, आनंद विहार सारखे भक्तनिवास बांधली. या सर्व भक्तनिवासमध्ये मंदिरात जो महाप्रसाद होतो तोच बनतो. कोणाला जर मंदिरात जाऊन प्रसाद खाता आला नाही तर ते आनंद विसावा, विहारमध्ये प्रसाद ग्रहण करू शकतात.

श्री गजानन महाराजांचे चमत्कार आणि चारधाम

महाराजांनी जिथे जिथे चमत्कार केले त्यापैकी जी चार प्रमुख स्थळ आहेत त्याला चारधाम ह्या नावाने संबोधल्या जातं. ती पुढील प्रमाणे आहे. मी ज्या क्रमाने तुम्हाला ह्या लेखात सांगतो आहे जर तुम्ही त्या क्रम मार्गाने पायी जात असाल तर मंदिरापासून सोयीचं होईल. तुमच्या सुविधेसाठी मी प्रत्येक मंदिराची (स्थळाची) Google Map ची लिंक टाकत आहे त्यामुळे कोणतं मंदिर (स्थळ) कुठे आहे हे बघायला सोप्प जाईल. दिराच्या मागच्या बाजूस सर्वप्रथम मारुती मंदिर पडतं, त्यानंतर जवळच बंकट सदन आहे, बंकट सदनापासून हाकेच्या अंतरावर प्रकटस्थळ आहे. त्यानंतर मोटे यांचे शिव मंदिर हे थोडे दूर आहे, तुम्हाला ९०० मीटर पायी चालता येत असेल तर ते पण तुम्ही करू शकता. (मारुती मंदिर,बंकट सदन, प्रकट स्थळ हे एकमेकांपासून हाकेच्या अंतरावर आहे. पायी चालणाऱ्यांनी मुख्य रस्त्याऐवजी गल्लीचा वापर करावा. लहान लहान बोळी (गल्ली) तुम्हाला दिसतील त्यामुळे तुमचा पायी चालायचा त्रास कमी होईल.


१) श्री मारुती मंदिर: श्री मारुती मंदिरात पाटलांच्या पुत्रांनी ऊसाने महाराजांना मारले, पण महाराजांच्या अंगावर एकही वळ उठला नाही. उलट पाटील पुत्र थकल्यावर त्यांना त्याच ऊसाचा रस महाराजांनी आपल्या हाताने ऊस पिळून पिऊ घातला. खंडू पाटलांना पुत्ररत्न होण्यासाठी महाराजांनी याच मंदिरात आशीर्वाद दिला.

Google Map Link : https://maps.app.goo.gl/f7gZNJmtmndDQ3vZ9?g_st=ac

२) बंकट सदन: श्री बंकट अग्रवाल हे महाराजांचे सर्वात लाडके भक्त होते. बंकटलाल अग्रवालांच्या घरी महाराज काही दिवस राहिले. तेथे अनेक चमत्कारही महाराजांनी केले होते. ते आज बंकट सदन म्हणून ओळखलं जातं.

Google Map Link: https://maps.app.goo.gl/9quQFQ3XxRGRSTf76?g_st=aw

३) प्रगटस्थान: श्री पातूरकर यांच्या मुलाचं ऋतुशांतीचा कार्यक्रम असताना दिनांक २३ फेब्रुवारी १८७८ ला जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळेस उष्ट्या पत्रावळी पातूरकरांच्या घरासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली टाकल्या होत्या. ती तिथी माघ वद्य सप्तमी होती. त्यादिवशी महाराज उष्ट्या पत्र्यावळ्यातलं अन्न वेचून खात असताना त्यांना शेगावचे प्रतिष्ठित सावकार श्री बंकट अग्रवाल आणि श्री दामोदरपंतांना महाराज सर्वप्रथम दिसले. महाराजांची दिव्य तेज आणि तेजस्वी दृष्टी पाहून बंकटलालांना ते कोणीतरी सिद्ध पुरुष असल्याची खात्री पटली. आज प्रगटस्थळी महाराजांचे स्मारक आहे आणि समोरचं वडाचं तेच अजानुबाहू वृक्ष डौलात उभं आहे.

Google Map Link: https://maps.app.goo.gl/mrjJWtoZb2qoR34P9?g_st=ac

४) मोटे शिव मंदिर: टाकळीकर बुवांचे याच मंदिरात कीर्तन सुरू असताना महाराज, बंकटलाल आणि पितांबरला दिसले. इथेच महाराज बंकटलालला माळीनीच्या घरून झुणका भाकर आणि पितांबरला नाल्यातून पाणी आणायला याच मंदिराशेजारी बसलेले असताना सांगतात. टाकळीकर बुवांचा द्वाड घोडा याच मंदिरात महाराजांनी त्याच्या पायात झोपून शांत केला.

Google Map Link: https://maps.app.goo.gl/VqPioZqgYkXEJBqh9?g_st=aw

५) कृष्णाजीचा मळा : गजानन महाराजांच्या लाडक्या भक्तांपैकी एक म्हणजे कृष्णाजी पाटील. गजानन महाराज त्यांच्या मळ्यात काही दिवस राहायला आले होते. त्यादरम्यान कृष्णजींना पत्रे टाकून तात्पुरती सावली करून द्यायची आज्ञा केली, त्याचदरम्यान ब्रह्मगिरी गोसावी आपल्या शिष्यांसवे तेथे आले, याच ठिकाणी जळत्या पलंगावर बसून त्याचे गर्वहरण केले. इथे महादेवाची सुंदर पिंड आहे, महाराजांची गाडी आणि सोबत निसर्गरम्य फुलांची झाडे आहे. (हे मंदिरापासून भक्तनिवासाची मागच्या बाजूस आहे, इथे वारकरी निवासाला जायच्या रस्त्याने पोहोचू शकतो) कृष्णाजीचा मळा हा चारधामचा भाग नाही पण तो खरंच खूप सुंदर आहे तो नक्की आवर्जून बघावा.

Google Map Link : https://maps.app.goo.gl/tTk1UG9PTTuJhNST6

टीप: ही चारही धाम मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आहे. तुम्ही तिथल्या कोणत्याही सेवेकऱ्याला विचारू शकता किंवा तिथे ऑटोसुद्धा मिळतो मोटे शिव मंदिर थोडं दूर असल्याने तुम्ही ऑटो करू शकता. ऑटोने साधारण १५०-२०० रुपये आकारतात. तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवू शकता. जर तुमच्याकडे गाडी असेल तर शक्यतो गाडी घेऊन जाण्याचा सल्ला मी तुम्हाला देणार नाही कारण तिथले रस्ते हे खूप लहान आहे गाडी प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. बंकट सदनाला कोणतेही वाहन जात नाही कारण ते एका बोळीत आहे. ऑटोसुद्धा फार दूर थांबतो तिथून तुम्हाला ६०-७० मीटर पायी चालावं लागतं.

Spread the love

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *