|| गण गण गणात बोते ||
श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील संतपरंपरेतील एक तेजस्वी संत आहेत. शेगाव ही त्यांची कर्मभूमी असली, तरी त्यांच्या असंख्य लीलांनी आणि परमभक्तांच्या माध्यमातून अनेक स्थळे आजही पवित्र मानली जातात. विदर्भाची पंढरी म्हणजे आपल्या श्री गजानन महाराजांचं शेगाव. मुंबई – हावडा या रेल्वेमार्गावर एक छोटंसं शेगाव हे गजानन महाराजांमुळेच प्रसिद्धीस पावलं. आज गजानन महाराजांची भक्त मंडळी फक्त विदर्भातचं नाही तर भारतभर, विश्वभर वेगाने वाढत आहे. कारणही तसंच आहे. “शेगाव सारखी स्वच्छता, “माऊली” म्हणून हाक मारणारे सगळे भक्तगण आणि मंदिराचं चौकटी पलीकडचं व्यवस्थापन. भारतभर तुम्ही कितीही-कुठेही फिरा पण शेगावसारखी शांतता तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. पक्ष्यांचा किलबिलाट, टाळ मृदूंगाचा नाद तुमच्या कानाला नवे सूर आणि जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतात.”
आज आपण महाराजांचे चार परमभक्तांविषयी बोलू. पहिले परमभक्त म्हणजे श्री भास्कर पाटील महाराज. दुसरे परमभक्त म्हणजे पुंडलिक महाराज भोकरे, तिसरे परमभक्त म्हणजे झ्यामसिंग, चौथी परमभक्त बायजाबाई.
अकोली जहागीर येथे १८८८ रोजी दुष्काळ पडला होता व महाराज चालत चालत भास्कर पाटील यांच्या शेतात आले.भास्कर पाटील यांनी आपल्या शेतात फार दुरून एक घागर पाण्याने भरून आणली होती, महाराजांनी त्यांना प्यायला पाणी मागितले तेव्हा भास्कर पाटलांनी महाराजांना पाणी देण्यास नकार दिला आणि ते महाराजांना वाईटसाईट बोलले. अकोली ग्रामस्थांची समस्या महाराजांना कळली व साक्षात पांडुरंगाला प्रार्थना करून महाराजांनी भास्कर पाटील यांच्या शेतातील १२ वर्षापासून कोरड्या असलेल्या विहिरीला जलमय केले व ही विहीर आजही जलमय आहे. तेव्हापासून भास्कर पाटील यांनी आपले घरदार सोडून महाराजांच्या बरोबर त्यांची सेवा करायला ते शेगावला आले.भास्कर पाटील हे सतत महाराजांबरोबर सावलीसारखे असायचे. सन १९०७ साली महाराजांच्या समक्ष भास्कर पाटील यांनी आपला श्वास सोडला व महाराजांनी त्यांना स्वहस्ते अडगाव येथे समाधी दिली.
मुंडगाव येथे १८९५ साली पुंडलिक भोकरे यांचा जन्म झाला.महाराजांच्या भक्तमंडळी मध्ये पुंडलिक सर्वात लहान होते.पुंडलिक महाराजांना प्रेमाने ‘बुढा’ म्हणायचे. महाराजांनी पुंडलिक यांना पादुकांचा प्रसाद दिला होता.महाराजांनी मंदिर परिसरात १९०८ साली पुंडलिक यांना प्लेगच्या रोगतून बरे केले.महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात पुंडलिकाचे फार मोठे योगदान होते. महाराजांनी समाधिस्त झाल्यावरही त्यांना दर्शन दिले होते. मुंबई येथे १९६८ साली पुंडलिक भोकरे यांचा मृत्यू झाला.
झ्यामसिंग शेखावत हे राजपूत गृहस्थ मुंडगांव येथे राहत होते. ते महाराजांचे फार मोठे भक्त होते. महाराजांनी पुंडलिक भोकरे यांना दिलेल्या पादुका ह्या झ्यामसींग यांच्याच हातून पाठवल्या होत्या. सन १९०८ साली महाराज सर्वप्रथम मुंडगाव येथे आले असताना ते झ्यामसींग यांच्या घरी राहिले.एकदा महाराजांची आज्ञा न ऐकता झ्यामसिंग यांनी घातलेल्या भंडाऱ्यात अचानक पाऊस आला व सर्व तयारी वाया गेली, तेव्हा महाराजांनी त्यांना दुसऱ्या दिवशी भंडारा ठेवायला सांगितले,असे म्हणताच महाराजांनी आकाशाकडे पाहिले व आभाळ फाकुन गेले. महाराजांच्या कृपेने दुसऱ्या दिवशी भंडारा निर्विघ्नपणे पार पडला. महाराजांची ज्या रथातून मिरवणूक काढण्यात आली होती त्या रथाचा अवशेष आजही मुंडगाव येथील मंदिरात आहे व झ्यामसिंग यांनी आपली सर्व इस्टेट महाराजांना अर्पण केली होती.
बायजाबाई या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या परमभक्त होत्या. त्यांचा जन्म मुंडगाव येथील गासे माळी कुटुंबात झाला. पूर्वीच्या प्रथेप्रमाणे वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी बायजाबाईंचा विवाह अकोट येथील शनिवार पेठेतील गबलाजी खलोकर यांच्याशी झाला. पण नशिबात संसारसुख नव्हते. बायजाबाईंना दुःखी जीवन भोगावे लागले. आई-वडिलांनी अनेक प्रयत्न केले, पण शेवटी तिला सासरीच ठेवण्याचे ठरवले. सासरी ज्येष्ठ दिराने तिच्यावर अनुचित आकर्षण दाखवले, तिचे चित्त विचलित करण्याचे प्रयत्न केले. पण बायजाबाईंनी ठामपणे त्याला धुडकावले. एकदा जेव्हा दिराने निर्लज्जपणे तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात त्याचा थोरला मुलगा माडीवरून खाली पडला आणि डोके फुटले. बायजाबाईंनी तात्काळ त्याची सेवा केली आणि दिराला सांगितले, “परस्त्रीची लालसा करणे योग्य नाही. हे तुमच्या कृत्याचे फळ आहे.” या घटनेने दिराला प्रचंड पश्चाताप झाला आणि त्याने तिचा नाद सोडला. अशाप्रकारे परमेश्वराने तिचे सत्वरक्षण केले. आई-वडिलांनी बायजाबाईंना शेगाव येथे श्री गजानन महाराजांकडे नेले. महाराजांनी स्पष्ट सांगितले,
“हिच्या नशिबात मुले-बाळे नाहीत. ही संसारासाठी जन्मली नाही. जगातील सर्व पुरुष हिचे तात (वडील) आहेत. तिला संसारात ढकलू नका.” महाराजांच्या आज्ञेप्रमाणे बायजाबाईंनी संसाराचा त्याग केला. त्या पुंडलिक भोकरे (मुंडगावचे परमभक्त) यांच्यासोबत वद्य एकादशीला शेगावला पायी वारी करू लागल्या. दोघांचे अंतःकरण शुद्ध होते, विषयवासनेला स्थान नव्हते. तरी गावकऱ्यांनी निंदा-नालस्ती सुरू केली – जातीभेद, प्रेमसंबंध अशा अफवा पसरवल्या. शेवटी आई-वडिलांनी दोघांना घेऊन महाराजांकडे न्यायासाठी गेले. महाराजांनी भुलाबाईंना उद्गारले, “भूले, आपल्या पोरीला दोष देऊ नकोस. पुंडलिक व बायजा हे पूर्वजन्मीचे बहीण-भाऊ आहेत. ही संसार करणारी नाही. ही जन्मभर ब्रह्मचारी राहील आणि भक्तिमार्गात मग्न राहील. संत जनाबाईने संत नामदेवांना गुरु केले तशी ही बायजा मला शरण आली आहे. ही माझी जनाबाई आहे! माझ्या जनाबाईला कोणी छळू नये.” महाराजांनी स्वतः “माझी जनाबाई” म्हणून बायजाबाईंचे श्रेष्ठत्व जगासमोर आणले. यामुळे त्यांचे नाव संत बायजाबाई असे झाले.
श्री गजानन महाराज यांनी सजल केलेली विहीर अकोली जहांगीर
मी वरील परिच्छेदात प्रत्येक भक्त आणि त्यांची ठिकाणं ठळक अक्षरात अधोरेखित केली आहे. आता आपण ती सगळ्या ठिकाणांविषयी जाणून घेऊ. मी प्रत्येक ठिकाण आणि त्यांचे क्रम पुढे देत आहे . आम्ही हि सगळी ठिकाण एका दिवसात बघितली त्याला जवळपास पाच ते सहा तास लागतात. रस्त्यांचे बांधकाम चालू असल्याने फार वेळ लागतो. मी तुम्हाला शेगाव वरून सुरवात करून परत शेगावला यायचा क्रम खाली देत आहे. शेगाववरून सगळ्यात आधी अकोली जहागीर गाठायचं. सगळ्यात दूर ते आहे. दूरचं ठिकाण आम्ही आधी केलं. शेगाव ते अकोली जहागीर ६९ किमी आहे.
महाराजांनी भास्कर पाटील यांच्या शेतातील १२ वर्षापासून कोरड्या असलेल्या विहिरीला जलमय केले त्या विहिरीला “सजल विहीर” म्हणतात व ही विहीर आजही जलमय आहे. श्री संत गजानन महाराजांनी आपल्या योगसामर्थ्याने श्री भास्कर महाराज (जायले) यांच्या अकोली जहागीर येथील शेत सर्वे ५२ च्या कोरड्या विहिरीला पाणी लावले .या विहिरीचे संतकवी दासगणू महाराज विरचित ‘गजानन विजय ‘ग्रंथात वर्णन पुढील प्रमाणे आहे ….
‘माध्यान्हीच्या समयाला | अकोली गावापाशी आला |
हा योग योगेश्वर साधू भला | श्री गजानन महाराज ||८६|| (अ.५)
आकोली गावाजवळ श्री गजानन महाराज आले
‘त्या अकोलीच्या शिवारात | जलाचे दुर्भिक्ष अत्यंत ||९२|| (अ ५ )
देवाही अकोली | पाण्यावाचून त्रस्त झाली ||११७|| ( अ.५)
अश्या प्रकारे अकोली जाहागीरचा स्पष्ट उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात आहे.
त्याच प्रमाणे श्री गजानन प्रार्थना स्त्रोत्रात ….
‘अकोलीच्या रानात | सर्व्हे नंबर बावन्नात |
एका शुष्क गर्दाडाप्रत | बनविली तुम्ही पुष्करणी ||८३ ||
असा स्पष्ट उल्लेख अकोली शेत सर्व्हे नं ५२ चा आहे .
” याते असत्य मानल्यास | सुखाचा तो होईल नाश |
भोगीत राहाल संकटास | वरचे वर अभक्तीने ||१७४|| (श्री ग.प्रा.स्त्रोत्र )
ही विहीर आता श्री गजानन महाराज संस्थान शेगावची अधिकृत शाखा आहे. त्रिभूवनैक पवित्र अशा श्री तीर्थ पुष्करणीच्या (विहिरीच्या) श्री तीर्थाचा लाभ दूरदूरचे भाविक भक्त घेवून व्याधी मुक्त होत आहेत .या अकोलीच्या विहीर परिसराचे सुशोभीकरण झाले असून याच शेतात श्री गजानन महाराज व त्यांचे पट्टशिष्य भास्कर महाराज यांचे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.या स्थळी श्रींच्या अनुभूतीची प्रचीती आल्याचा असंख्य भक्तांचा अनुभव आहे.


या विहिरीला तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला गजानन महाराज मंदिर अकोला जहागीर येथे यावे लागेल. मी खाली मंदिराचं लोकेशन टाकत आहे.
Google Location: गजानन मंदिर, अकोली जहांगीर
https://maps.app.goo.gl/m6Wfz7sWtY24rANH9?g_st=ac
श्री नरसिंग महाराज मंदिर, आकोट
अकोली जहागीर हे निसर्गाच्या छायेत एवढं सुंदर वसलं आहे कि त्या निसर्गात तुम्हाला एकांतात बसावसं वाटेल. पण पुढले ठिकाण गाठायचे होते म्हणून आम्ही अकोटला निघालो. अकोटला श्री नरसिंग महाराजांचे मंदिर आहे. गजानन महाराजांसाठी बंधूस्वरूप असलेल्या नरसिंग महाराजांवर विदर्भातील असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. एके दिवशी गजानन महाराज नरसिंग महाराजांना भेटण्यासाठी अकोटला आले होते. त्यावेळी नरसिंग महाराज गावातील एका विहिरीच्या काठावर बसले होते. गजानन महाराजांनी विहिरीत डोकावून पाहिले असता आतील पाण्याला झरे फुटून ते कारंज्याच्या रूपाने वर येऊ लागले. येथे जणू गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम झाल्याचे सांगत गजानन महाराजांनी या पाण्याने सचैल स्नान केले तसेच विहिरीला ‘मनकर्णिका’ असे नाव दिल्याचे सांगण्यात येते. ही ‘मनकर्णिका’ विहीर मंदिराच्या मागच्या बाजूस आहे. अकोली जहागीर ते अकोट १४ किमी आहे.

श्री नरसिंग महाराज मंदिर, आकोट
Google Location: श्री नरसिंग महाराज मंदिर, आकोट
https://maps.app.goo.gl/zS4RjC2N3P1hCG2R9?g_st=ac
अकोट हे शहर या मार्गावर एकमेव मोठं शहर आहे. तुम्ही जर जेवायच्या वेळेपर्यंत पोहोचत असाल तर इथे भांडे घरगुती खानावळ आहे. तिथे तुम्ही घरगुती पद्धतीचे जेवण करू शकता. मी इथे Google Location देत आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे जायला सोयीचे पडेल. भांडे भोजनालय हे नरसिंग महाराज मंदिरापासून जवळच आहे.

Google Location: भांडे भोजनालय
https://share.google/2JJbE04Z8JCo28hPo
श्री भास्कर महाराज समाधी मंदिर अडगाव
छान पोटोबा झाला कि श्री भास्कर पाटील समाधी मंदिर अडगावच्या दिशेने आपण जाऊ शकता. अकोट ते अडगाव हे १६ किमी आहे.

श्री भास्कर महाराज समाधी मंदिर अडगाव
२९ वर्षे शेगावी वास्तव्य करत भास्कर महाराजांनी गजानन महाराजांची सेवा केली. त्यादरम्यान गजानन महाराजांनी त्यांची अनेकदा परीक्षा घेतली. त्या सर्व परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेले भास्कर महाराज हे गजानन महाराजांचे पट्टशिष्य बनले. एकदा बाळापूर येथे दासनवमीच्या कार्यक्रमास गेले असताना भास्कर महाराजांना पिसाळलेला कुत्रा चावला. त्यावेळी गजानन महाराजांनी त्यांच्या शरीरात भिनलेले विष उतरवले. मात्र, ‘केवळ दोनच महिने तुझे आयुष्य उरले आहे,’ असे ते भास्कर महाराजांना म्हणाले. त्यानंतर गजानन महाराजांनी त्यांना त्र्यंबकेश्वर तीर्थाचे दर्शन घडवले. १९०७ मध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी गजानन महाराज शिष्यांसह अकोटवरून १० किमी अंतरावरील द्वारकेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी आले. गुरुवार, २ मे, चैत्र कृष्ण पंचमीचा तो दिवस होता. तो भास्कर महाराजांच्या प्रयाणाचा दिवस असल्याचे गजानन महाराजांनी सांगितले. तेथे उपस्थित असलेल्या शेकडो भाविकांना गजानन महाराजांनी ‘विठ्ठल विठ्ठल नारायण’ असा गजर करण्यास सांगितले. भास्कर महाराज माळबुक्का लावून पद्मासनात बसून ध्यानमग्न झाले. माध्यान्हीच्या समयी ‘हरहर’ असा शब्द उच्चारून त्यांनी प्राण सोडले. यानंतर द्वारकेश्वर पशुपती मंदिराच्या जवळ भास्कर महाराजांना समाधी देण्यात आली. या सोहळ्यानंतर गजानन महाराजांनी येथे १४ दिवस वास्तव्य केले. या सोहळ्याच्या वेळी परिसरात भास्कर महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अन्नदानही झाल्याचा उल्लेख ‘श्री गजानन विजय ग्रंथा’मधील अकराव्या अध्यायात आहे. या अन्नदान सोहळ्याच्या वेळी परिसरात मोठ्या संख्येने आलेल्या कावळ्यांचा उपस्थितांना त्रास होऊ लागला. त्यामुळे लोक कावळ्यांना मारण्यासाठी धावले. मात्र, गजानन महाराजांनी त्यांना तसे करण्यास रोखले आणि कावळ्यांना स्वहस्ते प्रसाद देत या परिसरात बारा वर्षे न येण्याची आज्ञा केली. त्यानंतर हे कावळे तेथून निघून गेले. तेव्हापासून या परिसरात कावळे फिरकत नसल्याची आख्यायिकाही सांगितली जाते.
समाधी सोहळ्यानंतर सलग तीन वर्षे, १९१० पर्यंत गजानन महाराजांनी येथे भास्कर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त उत्सव केला. पुढे भास्कर महाराजांचे नातू संत वासुदेव महाराज यांनी १९५५ मध्ये असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत येथील समाधीस्थानाचा जीर्णोद्धार केला.

श्री द्वारकेश्वर महादेव मंदिर
श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव
अडगाव ते मुंडगाव हे अंतर १७ किमी आहे. हा मार्ग अडगाव गावातून मुंडगावला जातो. छोटासा नागमोडी रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा हिरवेगार शेत दिसतात. रस्त्यात येणारे जनावर मोह वेधून घेतात. पांढरे शुभ्र बैलांची जोडी, गोडीने नांदणाऱ्या गाय वासरूंची जोडी, निरनिराळ्या रंगांच्या शेळ्या-मेंढ्या तुम्हाला चित्रपटातलं गाव भासेल असे सोंदर्य. कधी या रस्त्याने तुम्ही मुंडगावला पोहोचाल कळणार सुद्धा नाही. मुंडगाव हे गाव तुम्हाला स्वच्छ सुंदर दिसेल, गावात सुंदर रस्ते मंदिरापर्यंत सहज पोहोचता येईल असे आहे. गजानन महाराजांचे निस्सिम भक्त असलेले पुंडलिक भोकरे नित्यनेमाने शेगावला जात. १९०६ मध्ये गावातील भागाबाई नावाच्या महिलेने त्यांना ‘तू गजानन महाराजांच्या मार्गी लागू नकोस. त्याऐवजी तू माझ्यासोबत अंजनगाव येथे ये. आपण केजाजीचा शिष्य काशीनाथ यांना गुरू करू,’ असे सांगितले. त्यामुळे पुंडलिक यांच्या मनात विचारांचे काहूर उठले. त्या रात्री गजानन महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला. ‘दंभाचाराच्या नादी लागू नकोस’ असे सांगत गजानन महाराजांनी त्यांना ‘गण गण गणात बोते’ हा मंत्र दिला. त्यांनी ‘आणखी काही आस आहे का ?’, अशी विचारणा केल्यावर पुंडलिक यांनी नित्यपूजेसाठी पादुका देण्याची विनंती केली. त्यावर ‘उद्यापासून पादुकांची पूजा कर’, असे महाराजांनी सांगितले.
त्याच सुमारास मुंडगावचेच रहिवासी असलेले झामसिंग डोंगरसिंह शेखावत (राजपूत) हे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावी गेले होते. दादाजी म्हणून ओळखले जाणारे झामसिंह परिसरातील वयस्कर व श्रीमंत शेतकरी होते. ते गावी परत जाण्यासाठी निघाले असता, महाराजांनी त्यांच्याकडे आपल्या प्रासादिक पादुका सुपूर्द करत त्या पुंडलिक यांना देण्यास सांगितले. मुंडगावच्या वेशीपाशीच झामसिंग यांची पुंडलिक यांच्याशी भेट झाली. त्यावेळी ‘गजानन महाराजांनी माझ्यासाठी काही प्रसाद पाठवला आहे का ?,’ अशी विचारणा पुंडलिक यांनी केली. त्यामुळे चकित झालेल्या झामसिंग यांनी ‘तुला कसे समजले’, अशी पृच्छा केली असता पुंडलिक यांना गजानन महाराजांनी दिलेल्या दृष्टांताबाबत सांगितले. याच पादुका आजही मुंडगाव येथे आहेत. या घटनेनंतर, १६ जानेवारी १९०८ रोजी झामसिंग यांनी गजानन महाराजांना मुंडगाव येथे येण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार गजानन महाराज मुंडगावी आले. याबाबत आख्यायिका अशी की १७ जानेवारीला चतुर्दशीची रिक्त तिथी असल्याने या दिवशी भंडारा ठेवू नये, असे महाराजांनी ग्रामस्थांना बजावले. त्यानंतरही ग्रामस्थांनी भंडारा आयोजित केला. तसेच महाराजांची रथातून मिरवणूक काढली. मात्र, त्याचवेळी अचानक वादळ येऊन भंडाऱ्यासाठी बनवलेल्या अन्नात माती मिसळली गेली. चुकीची जाणीव झालेल्या ग्रामस्थांनी महाराजांची माफी मागितल्यावर आकाश पुन्हा निरभ्र झाले. दुसऱ्या दिवशी, पौष पर्णिमेला महाराजांच्या सांगण्यावरून पुन्हा भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. तेव्हापासून या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. मुंडगावच्या याच भेटीदरम्यान गजानन महाराजांनी झामसिंग यांना आपल्या लाकडी पादुका दिल्या.
यानंतर झामसिंग राजपूत यांनी पुंडलिक भोकरे यांच्यापुढे असा प्रस्ताव ठेवला की ‘गजानन महाराजांनी मलाही त्यांच्या पादुका दिल्या आहेत. तुझे घर कुडाचे आहे. गजानन महाराजांच्या दिव्य पादुका सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण दोन्ही पादुकांची माझ्या वाड्यात प्रतिष्ठापना करू. त्यासाठी मी माझा वाडा तसेच शेतजमीन दान करेन. पादुकांची पालखी उचलण्याचा मान तुझाच असेल.’ हा प्रस्ताव पुंडलिक यांनी मान्य केल्यावर झामसिंग यांच्या ५५०० चौरस फूट भागात पसरलेल्या वाड्यात दोन्ही पादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. अडगाव ते मुंडगाव हे अंतर १७ किमी आहे.

श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव
Google Location : श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव
https://maps.app.goo.gl/oDVzKJcaJZu1x9uY9?g_st=ac
मंदिराची रचना एखाद्या राजवाड्याप्रमाणे भासते. या मंदिराच्या तळमजल्यावर एका खोलीत गजानन महाराजांची गादी आहे. येथे महाराजांनी झामसिंह राजपूत यांना दिलेल्या पादुका तसेच महाराज विश्रांतीसाठी वापरत असलेला जुना पलंग आहे. त्यामागील बाजूला गजानन महाराजांची मूर्ती व डावीकडे बाळकृष्णाची छोटी मूर्ती आहे. येथे संत बायजाबाई तसेच पुंडलिक भोकरे यांच्याही प्रतिमा आहेत. नजीकच गजानन महाराज, भास्कर महाराज (अडगाव बुद्रुक) तसेच झामसिंग शेखावत यांचे मूळ छायाचित्र आहे. झामसिंग राजपूत यांच्या आग्रहावरून १९०८ मध्ये मुंडगाव येथे आलेल्या गजानन महाराजांची रथातून मिरवणूक काढण्यात आली होती. त्या रथाचा एक अवशेष तळमजल्यावर पाहायला मिळतो. त्यात गजानन महाराजांची प्रतिमा आहे.



दुसऱ्या मजल्यावरील मंदिरात गजानन महाराजांची शुभ्र संगमरवरी बैठी मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागील सोनेरी नक्षीदार प्रभावळीवर मयूर व सूर्य नक्षी कोरलेल्या आहेत. महाराजांच्या मूर्तीसमोर काचेच्या पेटीत गजानन महाराजांनी पुंडलिक भोकरे यांना दिलेल्या पादुका ठेवण्यात आलेल्या आहेत. या गर्भगृहाच्या दोन्ही बाजूने तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी सुमारे २० पायऱ्या असलेले दोन मार्ग आहेत. या पायऱ्या चढून तिसऱ्या मजल्यावर प्रवेश होतो. या मजल्यावरील गर्भगृहात श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती आहेत. या मजल्यावरील पारायण सभागृहात गजानन महाराजांचा जुना पलंग तसेच गजानन महाराजांची प्रतिमा आहे. प्रांगणात मंदिरानजीकच ‘अमृततीर्थ’ म्हणून ओळखली जाणारी प्राचीन विहीर आहे. तिला लागून पूर्व दिशेला गजानन महाराजांची धुनी आहे. असे सांगितले जाते की १९०८ मध्ये गजानन महाराज झामसिंग यांच्या वाड्यात आले होते तेव्हा त्यांनी येथे ही धुनी पेटवली होती. मंदिरासमोर झामसिंग सदन आहे. दररोज शेकडो भाविक तसेच पर्यटक या मंदिराला भेट देतात.

गजानन महाराज मूर्ती व पुंडलिक भोकरे यांना दिलेल्या पादुका


श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांच्या मूर्ती

अश्याप्रकारे तुम्हाला अकोली जहागीर, अडगाव, मुंडगाव, अकोट ह्या चार गावातील तीर्थस्थळांना भेटी देता येईल. मुंडगाव ते शेगाव हा शेवटचा टप्पा ५४ किमीचा आहे. ह्या चार स्थळांचा प्रवास बघावा तेवढा मोठा नाही पण काही रस्ते खराब असल्यामुळे तो मोठा भासतो. म्हणून शेगावपासून आपण सुरवात केली आणि परत शेवटी आपण शेगावला यायला जवळजवळ ६-७ तास लागतात. हा प्रवास तुमचा स्मरणीय असणार यात शंका नाही. तुम्हाला ह्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!! हा “श्री गजानन महाराज आणि त्यांचे परमभक्त लेख” भाग १ होता. भाग २ श्री इच्छेने लवकरच येईल यात तिळमात्र शंका नाही.
मी खाली सगळ्या मंदिरांचे Google Locations परत टाकतो आहे.
श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान, मुंडगाव
https://maps.app.goo.gl/oDVzKJcaJZu1x9uY9?g_st=ac
श्री गजानन महाराज यांनी सजल केलेली विहीर अकोली जहांगीर
https://maps.app.goo.gl/m6Wfz7sWtY24rANH9?g_st=ac
श्री नरसिंग महाराज मंदिर, आकोट
https://maps.app.goo.gl/zS4RjC2N3P1hCG2R9?g_st=ac
श्री भास्कर महाराज समाधी मंदिर अडगाव बुद्रुक
https://maps.app.goo.gl/N6n9uKCyPYRJ4CmW8?g_st=ac
टीप : श्रींच्या भक्तांच्या श्रद्धेवरील फायदा घेण्यासाठी अजून एक बनावट सजल विहीर जन्मास आली आहे. ती विहीर मौजे रुधाडी येथे आहे. हि विहीर धाबाई देवीच्या मंदिराशेजारी आहे म्हणून त्या विहिरीला धाबाईची विहीर असेही संबोधल्या जाते. या विहिरीचा भास्कर पाटलांच्या विहिरींसोबत काहीही संबंध नाही. कृपया याची नोंद घ्यावी.
तुम्हाला जर शेगावला मंदिरा शेजारील चार धाम बघायचे असल्यास तुम्ही खालील लिंक वर जा.
Siddhesh is a marathi poet and writer. He is a author of Marathi book named “Varadhast.”