MARATHI POET | WRITER | ORATOR

श्री गजानन महाराज संस्थान व्यवस्थापन आणि श्रींचे चार धाम

“विदर्भाची पंढरी” आपण मानाने ज्या भूमीला म्हणतो ती पावनभूमी दुसरी तिसरी कोणती नसून आपल्या श्री गजानन महाराजांची शेगावनगरी आहे. शेगाव म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते म्हणजे स्वच्छता, कामांचं नियोजन, आणि माऊली या शब्दातली जादू. एक संत आपल्या लहान-लहान कृतीतून जनसमुदायाला कसे घडवत जातात ते आपल्याला शेगावच्या गजानन महाराजांनी शिकवलं. पातूरकरांच्या ऋतुशांती कार्यक्रमा दरम्यान उष्ट्या पत्रावळीतले शितं खाऊन आपल्याला “अन्न हे पूर्णब्रह्म” हा संदेश दिला. बंकटलाल अग्रवाल शेगावचे प्रतिष्ठित सावकार, ज्यांना महाराज सर्वप्रथम दिसले आणि महाराजांमध्ये त्यांना वेगळंच तेज दिसलं. जे तेज बाकी लोकं ओळखू शकले नाही ते बंकटलाल यांनी अचूक ओळखले. आजही शेगावमध्ये महाराजांचा वास आहे आणि तो कायम असणारच. तो असणार कारण तिथले विश्वस्त ज्या प्रकारे व्यवस्थापन सांभाळत आहे, ते कोणत्याही “मॅनेजमेंट स्कूल” शिकवणार नाही. गर्दीचं चोख नियोजन. गर्दी कितीही असो, त्यांचं नियोजन योग्यच असतं. आजतागायत आपण कधीही ऐकलं नाही की शेगावला चेंगराचेंगरी झाली, कारण चोख नियोजन. श्री महाराजांनी आपल्यासमोर नियोजन कसं राहिल, हे सांगितलं आणि ते आपल्यासमोरचं अमलात आणलं. सुरवातीला पाणपोई, प्रसादालय सोबतच स्वच्छता ही समाधी घेण्याअगोदरच महाराजांनी नेमून दिलेली कामं होती. ही कामे आजतागायत चालू आहे. एवढीच नाही तर कित्येक अशी कामे आहे जे आपल्याला जगात कुठेही बघायला मिळत नाही. हेच बघा ना, गर्दी होते आहे तर भक्तनिवासाची संख्या वाढवली आणि दर म्हणाल तर अगदी सामान्य माणसाला परवडेल असेच आहे. मंदिर परिसरात एकूण ६ भक्तीनिवास आहे; एवढे कमी पडायला नको म्हणून आनंद विसावा, आनंद विहार सारखे भक्तनिवास बांधली. या सर्व भक्तनिवासमध्ये मंदिरात जो महाप्रसाद होतो तोच बनतो. कोणाला जर मंदिरात जाऊन प्रसाद खाता आला नाही तर ते आनंद विसावा, विहारमध्ये प्रसाद ग्रहण करू शकतात. महाप्रसादाची वेळ सकाळी ९ ते रात्री ९ अशी आहे. जर कोणी भाविक उशिरा येत असेल तर त्यांच्यासाठी रात्री १२ वाजतापर्यंत जेवणाची भक्तनिवासात व्यवस्था आहे. रात्री १२ पर्यंत जेवणाची व्यवस्था करण्याचा जो निर्णय आहे तो किती विचारपूर्वक घेतलेला आहे. कोणताही भाविक उपाशी राहायला नको, असा विचार मनात येणं किती मोठी गोष्ट आहे. ज्यांना घाई असेल त्यांच्यासाठी श्रीमुख दर्शनाची व्यवस्था आहे. ना धक्काबुक्की ना कसली घाई. आता तर एक स्क्रीन लागली आहे ज्यात तुम्हाला दर्शनाला किती वेळ लागेल हे लिहिलं असतं, त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला श्रीमुख दर्शन करायचं आहे की प्रत्यक्ष दर्शन करायचं आहे. यात तुम्ही वेळेचं नियोजन किती पद्धतशीर आहे हे बघा. तुम्ही जेव्हा चप्पल, जोडे उतरवायला जाता तिथे चप्पल, जोडे घालताना तुम्हाला बसायची व्यवस्था आहे, असं मी कोणत्याही मंदिरात आजतागायत नाही बघितलं. चप्पल, जोडे काढल्यानंतर समोरच तुम्हाला पाय धुवायला नळ दिले आहेत.

दुसरी खूप महत्त्वाची जी गोष्ट मला आवडते ती ही की “शिशूच्या क्षुधा शमनार्थ मातेकरिता व्यवस्था” म्हणजेच बाळाला दूध पाजण्यासाठी मातांकरता स्वतंत्र व्यवस्था. ही किती मोठी गोष्ट आहे. आपल्याला हे रेल्वेस्टेशन किंवा एअरपोर्टवर सुद्धा बघायला मिळत नाही. किती दूरवरचा विचार करतात हे विश्वस्त. संपूर्ण कारभार पारदर्शक, ही पारदर्शकता तिथल्या प्रत्येक सेवेकराच्या चेहऱ्यावर उजळत राहते. कोरोना काळात मंदिरं बंद असताना, कोरोना रुग्णाकरता विशेष बेड, डॉक्टर, परिचारिका आणि जेवणाची व्यवस्था इ. करण्यात आली होती.पारायण करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे म्हणून पारायणाची खोली वाढवण्यात आली, जेणेकरून जास्त लोकं पारायण करू शकतील. आरती सुरू असताना जे लोकं प्रदक्षिणा मारत आहे किंवा बाहेर बसलेले आहेत त्यांच्यासाठी टीव्ही लावलेले आहे जेणेकरून त्यांना उभं राहून टीव्हीवर आरती बघता येईल आणि आरतीत सहभागी होता येईल.

टीव्हीवर आरती

महाप्रसाद बारीकडे जाताना हात धुण्यासाठी विशेष नळ बसवलेले आहेत, जिथे टपटप पाणी पडत असतं जेणेकरून भाविक नळाला हात न लावता हात धुवू शकेल आणि महाप्रसाद दालनात जाऊ शकेल. असे नानाविध बदल तुम्हाला नेहमी अनुभवायला मिळतील. जे मंदिर तुम्ही ४-५ महिण्याआधी बघाल तेच मंदिर तुम्हाला नवीन बदलांसमवेत बघायला मिळेल. म्हणून मी नेहमी म्हणतो की एखाद्या मॅनेजमेंट स्कूलला लाजवेल असं व्यवस्थापन श्री संस्थान करतं.

श्री गजानन महाराजांचे चमत्कार आणि चारधाम

महाराजांनी जिथे जिथे चमत्कार केले त्यापैकी जी चार प्रमुख स्थळ आहेत त्याला चारधाम ह्या नावाने संबोधल्या जातं. ती पुढील प्रमाणे आहे.
१) प्रगटस्थान: श्री पातूरकर यांच्या मुलाचं ऋतुशांतीचा कार्यक्रम असताना दिनांक २३ फेब्रुवारी १८७८ ला जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळेस उष्ट्या पत्रावळी पातूरकरांच्या घरासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली टाकल्या होत्या. ती तिथी माघ वद्य सप्तमी होती. त्यादिवशी महाराज उष्ट्या पत्र्यावळ्यातलं अन्न वेचून खात असताना त्यांना शेगावचे प्रतिष्ठित सावकार श्री बंकट अग्रवाल आणि श्री दामोदरपंतांना महाराज सर्वप्रथम दिसले. महाराजांची दिव्य तेज आणि तेजस्वी दृष्टी पाहून बंकटलालांना ते कोणीतरी सिद्ध पुरुष असल्याची खात्री पटली. आज प्रगटस्थळी महाराजांचे स्मारक आहे आणि समोरचं वडाचं तेच अजानुबाहू वृक्ष डौलात उभं आहे.


२) बंकट सदन: श्री बंकट अग्रवाल हे महाराजांचे सर्वात लाडके भक्त होते. बंकटलाल अग्रवालांच्या घरी महाराज काही दिवस राहिले. तेथे अनेक चमत्कारही महाराजांनी केले होते. ते आज बंकट सदन म्हणून ओळखलं जातं.


३) मोटे शिव मंदिर: टाकळीकर बुवांचे याच मंदिरात कीर्तन सुरू असताना महाराज, बंकटलाल आणि पितांबरला दिसले. इथेच महाराज बंकटलालला माळीनीच्या घरून झुणका भाकर आणि पितांबरला नाल्यातून पाणी आणायला याच मंदिराशेजारी बसलेले असताना सांगतात. टाकळीकर बुवांचा द्वाड घोडा याच मंदिरात महाराजांनी त्याच्या पायात झोपून शांत केला.


४) श्री मारुती मंदिर: श्री मारुती मंदिरात पाटलांच्या पुत्रांनी ऊसाने महाराजांना मारले, पण महाराजांच्या अंगावर एकही वळ उठला नाही. उलट पाटील पुत्र थकल्यावर त्यांना त्याच ऊसाचा रस महाराजांनी आपल्या हाताने ऊस पिळून पिऊ घातला. खंडू पाटलांना पुत्ररत्न होण्यासाठी महाराजांनी याच मंदिरात आशीर्वाद दिला.

टीप: ही चारही धाम मंदिरापासून हाकेच्या अंतरावर आहे. तुम्ही तिथल्या कोणत्याही सेवेकऱ्याला विचारू शकता किंवा तिथे ऑटोसुद्धा मिळतो मोटे शिव मंदिर थोडं दूर असल्याने तुम्ही ऑटो करू शकता. ऑटोने साधारण १५०-२०० रुपये आकारतात. तुमच्या सोयीनुसार तुम्ही ठरवू शकता. जर तुमच्याकडे गाडी असेल तर शक्यतो गाडी घेऊन जाण्याचा सल्ला मी तुम्हाला देणार नाही कारण तिथले रस्ते हे खूप लहान आहे गाडी प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. बंकट सदनाला कोणतेही वाहन जात नाही कारण ते एका बोळीत आहे. ऑटोसुद्धा फार दूर थांबतो तिथून तुम्हाला ६०-७० मीटर पायी चालावं लागतं.

Spread the love

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *