श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हा दिव्य ग्रंथ श्री शंकर भटांनी संस्कृत भाषेत लिहिला. त्यानंतर तेलगू भाषेत श्री. मल्लादि गोविंद दीक्षितुलु यांनीअनुवादित केला. शंकर भटांचा मूळ संस्कृत ग्रंथ गंधर्वांनी श्रीपाद प्रभूच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला. त्याचे सिद्धयोग द्वारा पठन होत आहे.
लेखात काही नावांचा उल्लेख येईल त्यांच्याविषयीची थोडी माहिती
सत्यऋषीश्वर मल्लादि बापनावधानी (बापणाचार्युलु) – पीठिकापूर ब्राम्हण परिषदेचे अध्यक्ष (श्रीपादांचे आजोबा)
सुमती (श्रीपादांचे आई)
नरसिंह वर्मा – क्षत्रिय गृहस्थ (त्यांच्या कपिला गायीचे नाव “गायत्री” होते)
अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा (भारद्वाज गोत्र, आपस्तंभ शाखा) – श्रीपादांचे वडील (त्यांच्या घरी कालाग्निशमन नावाने ओळखली जाणारी दत्ताची मुर्ती होती, ती मूर्ती पूजेच्या वेळेस स्पष्ट बोलत असे. लहानपणीच अप्पलराज चे आई वडील स्वर्गवासी झाले (मातृ पितृ छत्र हरपले). पूजा समयी कालाग्निशमनाने “तू पिठापुरात जा आणि बापनावधानी यांच्याकडे जाऊन विद्याभास करावा” असा आदेश दिला.
वेंकटप्पेय्या श्रेष्टी – पिठापुरमचे प्रमुख व्यक्तींपैकी एक
वेंकावधानी – श्रीपादांचे मामा
तिरुमलदास – ७० वर्षीय वृद्ध श्रीपादांचा भक्त
शंकर भट – ज्यांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत लिहिला (लेखक)
श्रीधरराज शर्मा – श्रीपादांचा जेष्ठ बंधू जो जन्मतः आंधळा आहे
रामराज शर्मा – श्रीपादांचा जो जन्मतः पंगू/ लंगडा आहे
विद्याधारी – श्रीपादांची बहीण
राधा – श्रीपादांची बहीण
सुरेखा – श्रीपादांची बहीण
महत्वाची सूचना
प्रस्तुत लेखात आलेले संवाद मी जसेच्या तसे उतरवले आहेत. म्हणून मनात किंतु परंतु आणून किंवा संशय घेऊन वाचू नये. हा लेख श्रद्धापूर्वक वाचावा. मनात श्रद्धा नसेल तर कृपया हा लेख वाचू नये. कारण तुमच्या मनात जर शंका उत्पन्न झाली तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. कारण असे दोन प्रसंगाचे वर्णन ह्या चरित्रात केलेले आहेत. फक्त संशयामुळे त्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला. प्रस्तुत ग्रंथ प्रिसिद्ध निरुपणकार श्री हरिभाऊ निटूरकर यांनी मराठी भाषेत अनुवादित केला आहे. त्यांचा आशीर्वादाने मला श्रीपादांचे चरित्र वाचता आले.
पिठापुरमला पादगया असे का म्हणतात ?
पूर्वी एकेकाळी गयासुर नावाचा राक्षस देवतांना खूप त्रास देत होता. हा गयासूर इतका प्रचंड मोठा आहे की त्याचं मस्तक बोधगया येथे आहे तर पाय म्हणजे पाद पिठापूर येथे असल्याने या क्षेत्राला पादगया संबोधण्यात येते. गयासुरापासून असलेल्या त्रासामुळे सर्व देवता त्रिमूर्ती यांच्याशी असुरांचा शेवट कसा करायचा, यावर चर्चा करीत होते. त्या असुराचे त्रिमूर्तीसुद्धा काहीही बिघडवू शकत नाहीत, हे जाणून ब्रह्मदेवाने एक उपाय सांगितला. गयासुर जरी राक्षस असला, तरी तो नेहमी होम हवन करीत असे. म्हणून यज्ञ करण्यासाठी आपण त्याचे नाभीस्थान यज्ञकुंड म्हणून वापरायचे. त्यासाठी तो नाही म्हणणार नाही. ते सर्व गयासुराजवळ गेले व त्याचे नाभीस्थान यज्ञप्रदेश करण्यास, तेथे यज्ञ आयोजित करण्यासाठी अनुमती मागितली. गयासुराने त्यास मान्यता दिली. देवता व त्रिमूर्ती वरदान मागतात व आपण स्वतः वरदान देत आहोत, या कल्पनेचा त्याला अभिमान वाटला. त्रिमूर्तींनी त्याला एक नियम मात्र सांगितला. यज्ञाच्या काळात, दहा दिवस त्याने हलू नये. हलला तर तो मरेल, असे त्याला सांगितले. गयासुराने अहंभावात, त्या अटीस मान्यता दिली. यज्ञ भंग होणार नाही, असे अभयपण दिले. त्याने स्वतःचे शरीर अपरिमित वाढविले. नाभीजवळ ब्रह्माने यज्ञ सुरु केला. मृत्युभय त्याला नव्हतेच. दहा दिवस यज्ञकार्य सुरळीत चालले. ती रात्र संपली की गयासुराने दिलेले वरदान पूर्ण होणार होते. विष्णुमाया प्रभावामुळे गयासुरास लघुशंका अनावर झाली. त्याच वेळेस विष्णू प्रेरणेने कोंबड्याच्या आवाजात बांग दिली. कोंबड्याच्या ओरडण्याने पहाट झाली, असे समजून, गयासूर हलला. यज्ञभंग झाला. त्यामुळे त्याने शरीराचा त्याग केला. परंतु कीर्ति प्राप्तीसाठी, त्याने देवतांच्या मायोपायावर रागाने काही केले नाही. विष्णू जवळ प्राण जाण्यापूर्वी, त्याने वरदान मागितले. “हे देवतांनो ! हे शरीर जाणार याची मला भीती वगैरे अजिबात नाही. माझे डोके असलेल्या स्थानी ब्रह्मगया, नाभीप्रदेशी विष्णुगया व पायाच्या ठिकाणी पादगया, असे शिवक्षेत्र अशा पुण्यक्षेत्रांचा तो प्रदेश होईल, असा आशीर्वाद द्या. तुम्हीपण त्या त्या स्थानी, माझ्या समाधानासाठी पृथ्वीवर रहा. असे वरदान मागताच, त्रिमूर्तीनी आनंदाने आशीर्वाद दिला. पिठापुरात पादगयेजवळ शिव कुक्कुटेश्वर म्हणून उद्भवला. अनेक देवतांनी भरलेले असे पीठापुर महाक्षेत्र आहे. या पादगयेत पुण्यस्नान करुन, पितृदेवतेला पिंड वाहिल्यास विशेष पुण्य प्राप्त होते. येथील नंदेश्वर फार महिमान्वित आहे. अशा या पावन क्षेत्रात, श्री दत्तात्रेयस्वामी अपार कृपेने, स्वयंभू होऊन पादगया क्षेत्राला पावन करीत आहेत.
श्रीपादांनी पिठापुरमची निवड का केली ?
त्रेतायुगात भारद्वाज महर्षीनी “सावित्र काठक चयन” नावाचा महायज्ञ श्री क्षेत्र पीठिकापुरम येथे संपन्न केला होता. त्या यज्ञाप्रसंगी शिव पार्वतींना आमंत्रित केले होते. त्यावेळी शिवानी महर्षीना आशीर्वाद दिला की “तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा, सिद्धपुरुष, योगीपुरुष अवतार घेतील.” अनेक जन्मांच्या पूण्य कर्माने दत्तभक्तीचा अंकुर फटतो व॒ तो पुढे सातत्याने वाटत गेल्यास श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीचे दर्शन होते.
तिरुमलदास आणि श्रीपाद संवाद (गाडगे महाराज आणि साईबाबा अवतार)
तिरुमलदास म्हणाले “कुठल्याही जन्मी, कोणत्याही रुपात असताना सदैव माझे रक्षण करण्याचा भार तुमच्यावर आहे. मला तुमच्या बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीति आहे.”
श्रीपाद म्हणाले “तिरुमलदासा, तू महाराष्ट्र देशात गाडगे महाराज या नावाने रजक कुलात जन्म घेशील. दीन, दलीत व दुःखी जनाच्या सेवेत पुनीत होशील. धीशीला (शिर्डी) नगरीत “साई बाबा” या नावाने यवन वेषात माझ्या समर्थ सदगुरु रूपात अवतार होईल. तुला यवन वेषात समर्थ सदगुरु असलेल्या माझ्याकडून अवश्य अनुग्रहाची प्राप्ति होईल. तुला बाळकृष्ण रूपावर अतिशय प्रीति असल्या कारणाने, “गोपाला । गोपाला । देवकीनंदन गोपाला !” या नाम मंत्राचा जप करशील. या शरीराच्या पतनानंतर, क्वचित काळ हिरण्यलोकी राहून तदनंतर, गाडगे महाराज होऊन लोकहित करशील. हे तुला माझे वरदान व अभयदान !”
श्रीपाद श्रीवल्लभ – छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ सद्गुरू रामदास स्वामी आणि गजानन महाराज
आपले श्रीधर शर्मा (जेष्ठ बंधू) पुढील एका जन्मी “समर्थं रामदास” या नावाने एक महापुरुष होऊन महाराष्ट्र देशात जन्मास येतील. नरसिंह वर्मा “छत्रपती शिवाजी महाराज” या नावाने जन्म घेऊन महाराष्ट्रात राज्य स्थापित करून श्री समर्थ रामदासाचे शिष्यत्व पत्करतील. या प्रमाणे आपले पूर्वं संबध बंधूरूपात स्पष्टपणे कायम राहतील. समर्थ रामदास स्वामींच्यानंतर श्रीधर शर्मा शिवग्राम (शेगाव) क्षेत्रात “गजानन महाराज” नावाचा महायोगी होईल. त्याच्या मुळे शिवग्राम क्षेत्र महिमा अपरंपार वाढेल.
श्री हनुमंताला भूमीवर अवतार घेण्याची अनुज्ञा
श्रीपाद नेपाळ देशात गेले. तेथे एका पर्वतावर रामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास श्रीराम, सीता, लक्ष्मण, भरत आणि शत्रृूघ्न या सर्वांचे दर्शन एकत्रितपणे श्रीपादांनी घडविले. ते हनुमंताला म्हणाले, “हे हनुमंता, तू रामनामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत नाही. इतक्या थोड्या काळात तू रामनामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला सुध्दा त्याचा हिशेब ठेवणे अशक्य झाले. या मुळेच तू चिरंजीव पदास प्राप्त झालास. तू कालातीत आहेस. तुझे आयुष्य किती लक्ष वर्षे आहे ते चित्रगुप्ताला सुध्दा लिहिणे अशक्य आहे. तू कलियुगात अवतरीत हो, जितेंद्रिय होऊन सर्वांना वंदनीय होशील.”
यावर हनुमंत म्हणाला, “प्रभु राम बीज हे अग्निबीजच आहे. त्यांच्यामुळेच मला अग्नि सिध्दि प्राप्त झाली. मी देहबुद्धीने तुमचा अंश आहे. आत्मबुद्धीने मी तुमचेच स्वरूप झालो आहे. मी कोणत्या स्वरूपात अवतार घ्यावा ते मला सांगा.”
श्रीपाद प्रभु मंदहास्य करुन म्हणाले. “तू शिवांश स्वरूपाचा रामभक्त हो. अरबी भाषेत ‘अल‘ म्हणजे शक्ति आणि ‘अहा‘ म्हणजे ती शक्ति धारण करणारा म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ति स्वरूप असा त्याचा अर्थ आहे. इतकी वर्षे सीतापती म्हणून माझी सेवा केलीस आता यवन जातीच्या लोकांनी अंगिकार करण्यायोग्य असा शिवशक्ति स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर.”
यावर हनुमंत म्हणाला, “प्रभु मला भारद्वाज महर्षी त्रेतायुगात सावित्रीकाठक पिठापुरात करणार असल्याचे द्यात होते. त्यावेळी दिलेल्या वरामुळे तुम्ही भारद्वाज गोत्रात जन्म घेणार असल्याचे मला समजले होते. त्यामुळे मी तुम्हाला सोडून कोणत्याही परिस्थितीत राहू शकत नाही. तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे. त्यामुळे मी तुमचा मुलगाच आहे होय ना ?”
यावर श्रीपाद प्रभू म्हणाले “बालका हनुमंता तू धारण केलेला देह हा भारद्वाज गोत्राचा आहे.”
यावर हनुमंत म्हणाला “अल्ला मालिक याचा अर्थं अल्लाच सर्वांचा मालक आहे असाच ना ?”
श्रीपादांनी मोठ्या प्रेमभराने हनुमंतास आलिंगन दिले व म्हणाले “हनुमंता, तू देहबुध्दि सोडून दे. तू माझाच अंश आहेस.”
“प्रभो, याचा मी अंगिकार करतो, की मी तुमचाच अंश आहे,” हनुमंत म्हणाला, “मी या भूमीवर तुमचे कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईल तेव्हा अंश अवतार ही पूर्णपणे नष्ट होईल. अंश अवतारात मूळ तत्व माझ्या सोबतच राहतील. ती तत्वे जेव्हा फोफावतील तेव्हा तुमच्या शक्ति संपदा आणि मूळ तत्त्वानी मला धरून ठेवा .“
यावर श्रीपाद म्हणाले, “अरे हनुमंता, तू फारच बुध्दिवान आहेस. ज्या माझ्या शक्ति आहेत त्या तुझ्याच आहेत. मी नृसिंह सरस्वती अवतारात श्रीशैल्या जवळील कर्दळीवनात गुप्तपणे तीनशे वर्षे योग समाधिमध्ये राहीन. त्यानंतर प्रज्ञापूर (सध्याचे अक्कलकोट गाव) येथे स्वामी समर्थं या नावाने प्रसिद्ध होईल. हा अवतार समाप्त करते वेळी साई रुपात तुझ्यात अवतरीत होईल. मी हे स्पष्टपणे सांगतो की माझा अवतार तुझ्या स्वरूपात प्रकट होईल. त्यावेळी तू एका समर्थ सदगुरुच्या अवतारात प्रसिद्धी पावशील.”
यानंतर हनुमंत म्हणाला “प्रभू, मी तुमचा सेवक, अल्लाह मालिक!!” असे म्हणत संचार करीन. जीवत्व बुद्धीमुळे मी आपला अंश असून सुध्दा आपल्या प्रमाणे प्रवर्तन करु शकणार नाही. आपले श्रीचरण म्हणजे प्रत्यक्ष दत्त प्रभूच. आपणात आणि माझ्यात अंतर असणे कसे शक्य आहे. मी तुमच्या स्वरूपात आणि तुम्ही माझ्या स्वरूपात बदलल्यास आपणातील अद्वैत सिध्द होईल. यासाठी आपण मला दत्त प्रभूच्या सायूज्यतेचा प्रसाद दया.”
श्रीपाद प्रभूंनी कालपुरुषास आपल्याजवळ येण्याची आज्ञा केली. कालपुरुष श्रीपाद प्रभू समोर हात जोडून उभा राहिला. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले “हे कालपुरुषा ! हा हनुमंत कालातीत आहे. मी याला माझी सायुज्यता प्रसाद रूपाने दिली आहे. त्याला नाथ असे संबोधन देत आहे. आता पासून तो ‘साईनाथ’ या नावाने संबोधन केला जाईल. आज दत्त जयंती साजरी करू या.”
हनुमंतातील चैतन्य दत्त स्वरूपात प्रकट झाले. हे पाहून ऋषि समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू लागला. तेवढयात हनुमंताच्या शरीरातील जीवाणुचे विघटन झाले. त्यातून अनसूया माता प्रकटली. ती श्रीपाद वल्लभांना पाहून म्हणाली, “बाळ, कृष्णा ! तू किती उत्तम मुलगा आहेस. तुला जन्म दिला तेव्हा सर्व साधारण मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला झाल्या नाहीत. मातेला अशा वेदनेमध्ये सुध्दा एक प्रकारचे सुख असते त्यात माधुर्याची अनुभूति येत असते. परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचितच राहिले. तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस ना ? ही तुझी वैष्णवी माया मला समजत नाही.”
यावर श्रीपाद प्रभू म्हणाले,
“हे माते ! पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा पूर्ण करायचीच असते. तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे. त्याला माझी सायुज्य स्थिति प्राप्त करून दिली आहे. एका प्रकारे सांगायचे म्हणजे माझ्या मायेने मी तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे. थोडयाच वेळात तुला तीव्र प्रसव वेदना होतील. अनसूया मातेने तीन शिरे असलेल्या दत्तमूर्तीस जन्म दिला. थोडयाच वेळात ती मूर्ती अंतर्धान पावून तिच्या मांडीवर एक शिशु प्रकट झाला. त्या नवजात शिशूला अनसूया देवीने स्तनपान करविले. ही घटना घडल्यानंतर थोडयाच वेळात हनुमंताचे स्वरूप दिसले. त्याच्या समोर श्रीरामचंद्र उभे होते. त्यानंतर हनुमान म्हणाला “म्लेंच्छ धर्मातील चांगली तत्वे व सनातन धर्मातील उत्तम तत्वे या दोघांचा समन्वय करण्याचा मी प्रयत्न करीन. म्लेंच्छ लोकांचा सुध्दा गुरु असावा ना ?”
यावर श्रीपाद म्हणाले “मेहबूब सुभानी नावाचा एक महाज्ञानी माझ्यात समावलेला आहे. तो वारीफ अलिफ या नावाने अवतरीत होईल तो तुझा गुरु होऊन योगरहस्याचे ज्ञान देईल. क्रिया योगाचे ज्ञान शामाचरण नावाचे गुरु देतील. त्यांच्याकडून तुला हवे असलेले वर प्राप्त होतील.”
श्रीपाद श्रीवल्लभ – हनुमंत आणि माणिक प्रभू
हनुमंत म्हणाले, “प्रभू तुम्ही पद्मावती वेंकटेश्वर स्वरूप असल्याचे मी ऐकले होते. तुमची आराधना जाणणाऱ्या वैष्णव स्वामींना सुध्दा तुमचा अनुग्रह प्राप्त झाला.“
यानंतर श्रीपाद प्रभु म्हणाले “‘निरंतर माझे स्मरण करून माझ्या चैतन्य रूपात तुझ्या मनाला सदैव लीन कर. गोपालराव नावाचे महावैष्णव तुझे गुरु होतील असा मी तुला वर देत आहे. ते श्री वेकटेश्वराचे भक्त होऊन व्यंकंना या नावाने संबोधित होतील. त्यांच्या महा प्रयाणानंतर त्यांच्या अस्थि काही काळापर्यंत एका मातीच्या भांड्यात घालून भूमीमध्ये सूरक्षित ठेव. माझी सूचना मिळाल्यानंतर तू ते भांडे उघडून पहा त्यात वेंकटेशाची मूर्ती असेल. त्या मूर्तीची तू पूजा कर. मी प्रसन्न होईल आणि तुला इच्छित वर प्रदान करीन.“ यावर हनुमंत जानकी मातेस म्हणाला “माते तू मला अत्यंत प्रेमाने व वात्सल्यभावाने एक माणिक मोत्याचा हार दिला होतास. त्या हारातील माणीक मोत्यात राम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले. परंतु त्यात श्रीराम दिसले नाही म्हणून तो हार मी फेकून दिला. या महान अपराधाची मला क्षमा करावी.”
यावर श्रीपाद प्रभू म्हणाले “देवाच्या सान्निध्याशिवाय कोणतेही कार्य पूर्णतेस जात नाही. तो माणिकाचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे. तो हार दत्त स्वरुप आहे यात शंकाच नाही. माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्या हारात प्राण ओतले आहेत. तो माणिकाचा हार गुरुस्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत होता. ते गुरु स्वरूप माणिक प्रभूच्या स्वरूपात प्रसिध्द पावेल.”
श्रीपाद आणि कल्की अवतार
श्रीपादाच्या आजी म्हणाल्या “अरे बाळा, तुझा विवाह सोहळा पाहण्यासाठी आमचे डोळे आतुर होत आहेत. तुझा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने साजरा झालेला आणि तुझ्या कपाळावर लग्नाच्या टिळा लाऊन, मुंडावळ्या बांधलेला, सर्व श्रुंगारानी नटलेला नवरदेव आम्हास पहायचा आहे.”
श्रीपाद म्हणाले “आजी ! अवश्य तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. मी कल्की अवतारात शंबल गावात जन्म घेईल त्या वेळी पद्मावती नावाच्या अनघालक्ष्मी बरोबर विवाह करीन. परंतु यासाठी काही काळ लागेल. तुमची इच्छा मात्र मी अवश्य पूर्ण करीन.”
यावेळी श्री वैकावधानी (श्रीपादांचे मामा) आणि त्याच्या धर्मपत्नीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहात होत्या. यावर श्रीपाद प्रभू म्हणाले “मामा, आपले बंधन शाश्वत स्वरूपाचे आहे. मी केवळ तुमचाच जावई आहे, असे नाहीतर तुमच्या वंशातील जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी जावईच आहे. मी माझ्या दिव्य लीलांनी तुम्हास सुखवीत जाईल. कल्की अवताराच्या वेळी पद्मावती देवीचा वधु स्वरूपात स्वीकार करुन तुमची मनोकामना पूर्ण करीन. सुमती महाराणीचे दुःख दूर करीन. तिचा लाडका पुत्र, सर्वपुत्रांप्रमाणे, नवरदेवाच्या स्वरूपात नटलेला न पहाता एका यतीच्या रुपात, वैराग्य धारण केलेला पाहून ती दुःखी झालेली आहे.”
श्रीपाद प्रभू आईकडे पाहून म्हणाले, “आई ! तू आणि अनसूया माता मला वेगळ्या वाटतच नाहीत, तुम्हा दोघींच्या मनोकामना मी कल्की अवतारात नक्की पूर्ण करील.” श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले “आई, तुझ्या गर्भातून जन्म घेतल्याने मी केवढा महान झालो. तुझ्या वात्सल्यामृतानेच माझे भरण-पोषण झाले. माझी बहिण वासवीने केवढे महान कार्य केले ते पाहिलेस ना ? मला भूक लागली असताना माझे लहान बाळात रूपांतर करून अनसूया मातेजवळ दुग्धपान करण्यास पाठवले.”
श्रीपाद आणि त्यांचे आजोबा बापणाचार्युलु
“लाभ” हा गणेशाचा पुत्र एका युगात ‘लाभाद महर्षी’ या नावाने नावाजला होता. तोच श्रीकृष्ण अवतारात ‘नंद’ या रूपात जन्मास आला. श्री वासवीमाता या भूमीवर भास्कराचार्य या नावाने अवतरल्या. “लाभ” श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारकालात त्यांचे आजोबांच्या स्वरूपात जन्मास आले होते. आपल्या तत्वा मध्ये विघ्नविनाशक तत्व स्थिर करून श्रीपादप्रभु अवतरले. ते अवतरले तेव्हा चित्रा नक्षत्र होते. त्या नक्षत्रापासून सत्ताविसावे नक्षत्र हस्त असताना कुरवपुरात अदृश्य झाले.
श्रीपाद श्रीवल्लभ आणि शंकर भटांचा शेवटचा संवाद
“अरे शंकर भट्टा! मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे. मी कृष्णा नदीत अंतर्धान पावून या कुरवपुरात गुप्त सूपाने संचार करीन नंतर नृसिंहसरस्वती नावाने संन्यासी रुपाने धर्माच्या उध्दारासाठी अवतार घेईल. तू लिहीत असलेला “श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत” „ महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरू समान लाभप्रद होईल. तो “अक्षर सत्य” ग्रंथ असेल.” “दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा” या माझ्या नावाचा जयघोष सर्वत्र होईल. या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल. इहलोक आणि परलोकात सौख्य प्राप्त होईल. या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्यासमान मानला जाईल. तु लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील. तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील. हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो. तुझ्या संस्कृत ग्र॑थाचा तेलुगु भाषेत अनुवाद केला जाइल तो बापणाचार्युलुच्या तेहतीसाव्या पिढीतील वंशजाकडून उदयास येईल. या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील. या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्ताचे सर्व काही शुभ मंगल होऊन त्याचे सकल व्याधिपासून रक्षण होईल.”
श्रीपाद प्रभू शंकर भटास पुढे म्हणाले “तू माझी खूप सेवा केलीस. तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन मनोभावाने माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलेस. मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे. मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तू तीन वर्ष येथेच रहा. या तीन वर्षात मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहील. तसेच अनेक योग रहस्याबद्दलचे ज्ञान देईल.”
हे शंकर भटा, तीन वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीस तू रचलेला ‘श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ‘ ग्रंथ माझ्या पादुकाजवळ ठेव . त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील.
सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद!!!
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ” ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूच्या मामाच्या घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्र॑थाचा तेलुगु भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलुगु भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वांनी तो श्रीपाद प्रभूच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला . त्याचे सिद्धयोग द्वारा पठन होत आहे.
संदेश
मला ह्या लेखातून काही ठळक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवायची होती, ती श्रीपादांच्या कृपेने मला पोहोचवता आली. श्रीपादांच्या लीला तुम्ही प्रत्यक्ष “श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत” या ग्रंथातून वाचा. तुम्हाला वाचताना आल्हाददायक आणि प्रसन्न वाटेल.
“श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तिरस्तु”
“दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा”
Siddhesh is a marathi poet and writer. He is a author of Marathi book named “Varadhast.”