गुरुचरित्र वाचत असताना गोकर्ण या तिर्थक्षेत्राचा उल्लेख आढळतो. सहाव्या अध्यायात याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. पुलस्य ब्राह्मण आणि त्याची भार्या (पत्नी) कैकसी हे दोघे खूप धार्मिक होते. कैकसी ही नित्यनेमाने शिवपूजन केल्याशिवाय अन्नग्रहण करत नसे. एके दिवशी तिला पूजा करायला एकही शिवलिंग उपलब्ध नव्हते, तेव्हा तिने वाळूचे शिवलिंग तयार केले आणि त्याची मनोभावे पूजा केली. कैकसीचा पुत्र “रावण” तेथे आला आणि आईला वाळूची पूजा करताना त्याला कमीपणा वाटला. रावण मातेला म्हणतात,”माते, मी तुला शिवासह कैलासपर्वतचं लंकेला आणून देतो” अशी घोर प्रतिज्ञा घेऊन रावण कैलास पर्वतावर जातात. तिथे आपल्या वीस हातांनी कैलास पर्वत गदागदा हलवू लागतात. त्यामुळे त्रिभुवन डगमगू लागते. पार्वती भयभीत होऊन भगवान शंकराला विनवी करतात की रावणाला आवर घाला. तेव्हा भगवान शंकर आपल्या डाव्या हाताने शिखरावर दाब देतात त्यामुळे रावण पर्वताखाली दबून जातात. तेव्हा रावण शंकराची वेगवेगळ्या रांगांमध्ये प्रार्थना करतात. भगवान शंकर प्रसन्न होऊन वर मागायला सांगतात. रावण मातेच्या पूजेसाठी कैलास पर्वत मागतात तेव्हा भगवान शंकराने त्यांना “आत्मलिंग (प्राणलिंग)” दिला. शंकर म्हणतात की, “हे आत्मलिंग माझे प्राण आहे. याची तू तीन वर्षे पूजा कर, तू ईश्वरस्वरूप (अमर) होशील. पण हे प्राणलिंग घेऊन जाताना कुठेही जमिनीवर ठेऊ नको नाहीतर ते तिथेच स्थापन होऊन जाईल”.
रावणाला आत्मलिंग प्राप्त करून आनंद झाला आणि ते लंकेच्या दिशेने मार्गस्थ झाले. तेव्हा नारदमुनी इंद्रदेवाला ही गोष्ट सांगतात तेव्हा इंद्रदेव भयभीत होतात. इंद्रदेव, ब्रह्मदेवाकडे मदत मागतात तेव्हा ब्रम्हदेव इंद्रदेवाला घेऊन श्री विष्णूकडे जातात. श्रीविष्णूंना सर्व माहिती देतात. श्री विष्णू सगळ्यांना घेऊन महादेवाकडे जातात आणि महादेवाला म्हणतात,”आत्मलिंग प्राप्त झाल्यामुळे रावण अमर होण्याचा धोका वाढला आहे, तो सृष्टीचा उद्रेक करू शकतो. असा वर तुम्ही त्याला का दिला?” भगवान शंकर म्हणतात, “मी रावणाच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला वर दिला”. तेव्हा श्री विष्णू शंकराला विचारतात की रावणाला निघून किती वेळ झाला ? तेव्हा भगवान शंकर सांगतात की रावणाला निघून पाच घटका झाल्या असेल. श्री विष्णू, नारदमुनी आणि गणेशाला त्याला थांबवण्यासाठी पाचारण करतात आणि आपल्या चक्राने सूर्य झाकून अंधार करतात. श्रीविष्णू नारदमुनीला सांगतात की मी चक्राने सूर्य झाकला आहे तू रावणाला संध्याकाळ झाल्याची आठवण काढून त्याला सायंसंध्या (संध्या वंदन) करायला धाड म्हणजे तो आत्मलिंग जमीन वर ठेऊन संध्या करायला जाईल आणि तिथेच आत्मलिंग स्थापित होऊन जाईल. श्री गणेश बालरूपात ब्रह्मचाऱ्याचे रूप घेऊन नदीकाठी खेळत असतात. नारदमुनी, रावणाच्या समोर जाऊन उभे होतात आणि त्यांना सायंसंध्या करण्यासाठी आठवण काढून देतात. नारदमुनी रावणाला म्हणतात की, “तुमची संध्या होत पर्यंत मी आत्मलिंग पकडून राहतो तुमची संध्या झाल्यावर मी तो तुम्हाला परत देईल”. रावणाला नारदावर विश्वास नव्हता म्हणून त्याने आजू बाजूला बघितले असता त्याला एक ब्रह्मचारी बालक खेळताना दिसला. रावण त्या बालकाकडे जातात आणि त्याला घट्ट धरून त्याला विचारतात की, “तुझे माता-पिता कोण?” बाळ गणेश त्यांना उत्तर देतो की,”माझे पिता जटाधारी आहे त्यांचे नाव शंकर आहे ते घरोघरी भिक्षा मागतात आणि माता जगन्माता आहे”. बाळ गणेश तेव्हा “बलात्कार” या शब्दाचा उल्लेख करतात. बाळ गणेश म्हणतात, “मला तुम्ही (बलात्काराने) बळजबरीने पकडून माझ्या सारख्या लहान बालकाकडून काहीतरी चुकीचे कार्य करवून घ्याल”. तेव्हा रावण हसून लहान ब्रह्मचाऱ्याची समजूत काढतात आणि म्हणतात माझी सायंसंध्या होत पर्यंत तू हे आत्मलिंग धरून ठेव. तेव्हा बाळ गणेश म्हणतो की, “माझ्या सारख्या लहान मुलाच्या हातात हे वजनी शिवलिंग तुम्ही देत आहात हे मी कसं पकडू शकेल? तरी मी पकडून ठेवील पण एका अटीवर, जर मला सहन झालं नाही तर मी तीन वेळा आवाज देईल तुम्ही तिसऱ्या आवाजाला नाही आले तर मी हे शिवलिंग इथेच ठेऊन दिल.” रावण, बाळ गणेशाची अट मान्य करतात संध्या वंदनाला जातात. बाळ गणेश पहिली हाक रावण अर्घ्य देताना देतो त्यानंतर दुसरी हाक देतो. दुसऱ्या हाकेला रावण लवकर येतो असं म्हणतात आणि बाळ गणेश तिसरी हाक देऊन आत्मलिंग जमिनीवर ठेवतात. ते आत्मलिंग तिथेच स्थापित होते. रावणाला प्रचंड क्रोध येतो आणि ते गणेशाला फटकारतात. रावण पिंडीला आपल्या महा बलाने बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात म्हणून त्याला “महाबळेश्वर लिंग” म्हणतात. रावण एवढा बळाचा वापर करतात की त्या लिंगाचा आकार गायीच्या कानाप्रमाणे होतो (गोकर्ण). अशाप्रकारे गोकर्ण महाबळेश्वरची स्थापना श्री गणेशाच्या हस्ते झाली आहे म्हणून त्याला विशेष महत्व प्राप्त आहे.
ही आख्यायिका सांगण्याचा तात्पर्य हेच की आपल्याला आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे हे कळायला हवं. प्रामुख्याने २०१३ मध्ये भारतात ‘बलात्कार’ याची व्याख्या व्यापक करण्यात आली आहे. मुली/स्त्रियांचा छळ , लैंगिक हल्ले, बळजबरी करणे याला बलात्कार असं नाव देण्यात आलं. बलात्कार हा प्राकृत मराठी पासून वापरण्यात येणारा शब्द आणि त्याचा योग्य अर्थ “बळजबरी” हे सांगण्यासाठी ह्या लेखाचा उद्देश होता. एका शब्दाचा नवीन अर्थ आपल्याला माहिती देण्यासाठी ह्या लेखाचा मी आधार घेतला. तुम्हाला जर गुरुचरित्रातले असेच नवनवीन शब्द आणि त्यांचे अर्थ आख्यायिका समवेत हवे असतील तर तुम्ही कंमेंट करून सांगा. मला जसा वेळ मिळेल मी तसं लिहून त्याविषयी लेख लिहिण्याचा प्रयत्न करील.
Siddhesh is a marathi poet and writer. He is a author of Marathi book named “Varadhast.”